घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक अकाउंटचा गैरवापर, वैयक्तिक फोटो केला अपलोड, एकाविरुद्ध गुन्हा

घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक अकाउंटचा गैरवापर, वैयक्तिक फोटो केला अपलोड, एकाविरुद्ध गुन्हा
Share

लोणी काळभोर – घटस्फोटानंतर पूर्वीच्या पत्नीच्या जुन्या फेसबुक खात्याचा गैरवापर करून तिचा आणि तिच्या मित्राचा वैयक्तिक फोटो फेसबुकवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील थेऊर येथे घडली आहे.

या प्रकरणी अभिजित उदय देशमुख (रा. थेऊर, ता. हवेली) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर फोटो अपलोड करून नातेवाईक आणि समाजात बदनामी केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि अभिजित देशमुख यांचा विवाह २०२३ मध्ये झाला होता. मात्र, कौटुंबिक वादातून दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला. त्यानंतर संबंधित महिला आपल्या आई-वडिलांकडे राहू लागली.

१७ ऑगस्ट २०२६ रोजी महिलेच्या एका मित्रामार्फत तिच्या जुन्या फेसबुक खात्यावर तिचा आणि मित्राचा एकत्रित वैयक्तिक फोटो अपलोड केल्याची माहिती तिला मिळाली. या फेसबुक खात्याचा पासवर्ड माजी पतीकडे असल्याने, त्यानेच खात्याचा गैरवापर केल्याचा संशय महिलेने व्यक्त केला.

या घटनेनंतर महिलेने २९ ऑगस्ट रोजी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित फेसबुक खाते आणि तांत्रिक माहितीची चौकशी केली. या चौकशीत काही मोबाइल क्रमांक समोर आले.

अखेर १२ ऑक्टोबर रोजी महिलेने माजी पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Vedh News