दुचाकीच्या अपघातात बहीण भावाचा मृत्यू ; कुटुंबाचा अवयवदान करण्याचा निर्णय

दुचाकीच्या अपघातात बहीण भावाचा मृत्यू ; कुटुंबाचा अवयवदान करण्याचा निर्णय
Share

पिंपरी- दुचाकीवरून घोरवडेश्वर येथे फिरायला गेलेल्या बहीण भावाचा अपघाती मृत्यू झाला. घोरवडेश्वर येथून परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

कौशिक मुल्या (वय २३) व ऋषिता मुल्या (वय २१) अशी या दुर्दैवी बहीणभावाची नावे आहेत. भोसरीच्या इंद्रायणीनगर मिनी मार्केटमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करणारे रवी मुल्या यांची ती मुले होती.

रविवार (दि. ११ ) रोजी दुपारी बहीण भाऊ दोघेजण दुचाकी वरून विसापूर घोरवाडेश्वर या ठिकाणी फिरायला गेले होते. घरी परत येताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल पूना गेट समोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर दोघांनाही इंद्रायणीनगर येथील मेडिकव्हर या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरु असतानाच भाऊ कौशिक याचा रात्री साडेदहाच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर बहीण ऋषिता हिला रविवारी रात्री बाणेर येथील ज्युपिटर या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी ब्रेन डेड झाल्याने ऋषिता हिने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला.

दोघांच्याही मृत्यूमुळे मुल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या दुःखातून स्वतःला सावरत कुटुंबीयांनी ऋषिताच्या अवयवाचे दान करण्याचा निर्णय घेतला. भाऊ कौशिक हा एम आय टी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता तर बहीण ऋषिता ११ वी मध्ये शिक्षण घेत होती.

Vedh News