“तुमच्या काकाने दर ठेवलाय का ?”… दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्याला सुनावले

आंबेगाव- साखर कारखानदारी अडचणीत असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी संघटना उसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्या, अशी मागणी करत आहे. तुमच्या काकाने ऊसाला ५ हजारांचा दर ठेवलाय का? अशा शब्दात दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्याला सुनावले. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ समारंभात वळसे पाटील बोलत होते.
शेतकरी संघटना उसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्या, अशी मागणी करत आहे. मला अशा लोकांचं काही कळतच नाही. काहीही मागणी करतात. एखादा कारखाना चालवायला घ्यावा आणि मग त्यांनी ऊसाला पहिली उचल पाच हजार मागावी. कुठून देणार उचल, कर्ज काढून…? बंद पाडायचाय का कारखाना? अशा शब्दात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शेतकरी संघटनेला सुनावले आहे. यंदाच्या दुष्काळामुळे साखर कारखान्यांना ऊसटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यातच ऊस लागवडही अडचणीत येण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी साखर कारखाने सुरू होतील की नाही, याबाबत वळसे पाटील यांनी भीती व्यक्त केली आहे.
सध्या देशात साखरेचा तुटवडा असून राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला साखर हवी आहे. त्यामुळे ऊसाच्या रसापासून किंवा मोलेसेस पासून साखर निर्मितीला सरकार परवानगी देणार नाही. त्यामुळे यंदा फक्त मळी पासूनच इथेनॉल निर्मिती करण्याची वेळ साखर कारखान्यांवर येणार आहे. असे मत माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.






