सिंहगडावर फडकणार १०० फुटी भगवा! ! महापौर मंजुषा नागपुरे यांची मोठी घोषणा

पुणे- स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंहगडावर १०० फूट उंचीचा भगवा ध्वज फडकणार आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महापालिकेच्या वतीने हा ध्वज उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि संरचनात्मक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ जवळील एक एकर जागेची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून ही जागा निश्चिती केली असून, सिंहगड परिसरापासून दूरवरूनही हा भव्य भगवा ध्वज स्पष्टपणे दिसावा, याचा विचार करून मोक्याच्या ठिकाणी ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वेळी पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, तसेच एमटीडीसीचे चीफ रिजनल मॅनेजर हनुमंत खेडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांनी पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जागा, ध्वजस्तंभाची उंची, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी, तसेच परिसराच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाची माहिती घेतली. ध्वज उभारणीनंतर रात्रीच्या वेळीही त्याचे भव्य स्वरूप उठून दिसावे, यासाठी अत्याधुनिक विद्युत रोषणाईची विशेष व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येणार आहे.
“सिंहगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि मावळ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास सांगणारा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक भूमीवर उभारण्यात येणारा १०० फुटी भगवा ध्वज हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणारे प्रतीक ठरेल.” असे महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या.





