धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला, चालक बेखबर

पिंपरी- रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला. विशेष म्हणजे, रुग्णवाहिका चालकाला याचा पत्ताच नव्हता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
ही घटना निगडी परिसरात घडल्याचे बोलले जात आहे. रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका भररस्त्यावरून जात असताना अचानक मागचा दरवाजा उघडला आणि रुग्णाला झोपवलेले स्ट्रेचर थेट रस्त्यावर धावत्या गाडीतून खाली पडले. रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी आणि रस्त्यावरील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली.
या गंभीर प्रकारानंतर काही नागरिकांनी दुचाकीवरून पाठलाग करत त्या रुग्णवाहिकेला पुढे जाऊन थांबवले आणि चालकाला मागे घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर चालक पुन्हा रुग्णवाहिका मागे घेऊन घटनास्थळावर परतला आणि खाली पडलेल्या रुग्णाला पुन्हा स्ट्रेचरसह गाडीत घेण्यात आले.
अशाप्रकारचा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित रुग्णवाहिका चालकावर आणि यंत्रणेवर कठोर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






