मेट्रोमोनिअल साइटवरून लग्न जमवण्याची मोजली किंमत ; दोघांनी घातला मंत्रालयातील उच्चशिक्षित महिला अधिकाऱ्याला १८ लाखांचा गंडा

मुंबई – मेट्रिमोनिअल साईटवरून शोधलेल्या दोन जोडीदारांनी मुंबईच्या मंत्रालयात नोकरी करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला तब्बल १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंत्रालयातील एका विभागात अधिकारी म्हणून सेवेत आहेत. योग्य जोडीदाराच्या शोधासाठी त्यांनी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. या प्रोफाईलच्या आधारे सुनील नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. आपण युकेचे नागरिक असून लग्नासाठी इच्छुक आहोत असे सांगून त्याने पीडितेशी मैत्री केली. काही दिवस ऑनलाइन चॅट करून आरोपीने विश्वास संपादन केला. त्यानंतर भेटवस्तू, कस्टम क्लिअरन्स आणि विविध वैयक्तिक कारणे सांगून त्याने पीडितेकडून पैसे ऑनलाईन लुबाडून घेतले.
दरम्यान, विशाल नावाच्या दुसऱ्या एका भामट्यानेही संबंधित पीडितेशी संपर्क साधून स्वतःला कॅनडाचा रहिवासी असल्याचे भासवले आणि लग्नाची तयारी दर्शवली. त्यानेही कौटुंबिक अडचणी व आपत्कालीन परिस्थितीची खोटी कारणे सांगून सीमा यांच्याकडून मोठी रक्कम ऑनलाईन वर्ग करून घेतली.
या दोन्ही आरोपींच्या भुलथापांना बळी पडून सागरिका यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. मात्र, वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्याने आणि लग्नाबाबत दोघांकडून टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, बँक खाते क्रमांक आणि फोन नंबर्सच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.






