शिरूरमध्ये मालक समजून कामगाराची गोळ्या झाडून हत्या ! ५ लाखांची होती सुपारी

शिरूरमध्ये मालक समजून कामगाराची गोळ्या झाडून हत्या ! ५ लाखांची होती सुपारी
Share

शिरूर – शिरूर जवळील कारेगाव येथे २९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पाण्याच्या प्लांटमध्ये एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला असून मारेकऱ्यांनी पाण्याच्या प्लांटचा मालक समजून निष्पाप कामगाराची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

सुरुवातीला हा प्रकार वैयक्तिक वादातून झालेला एक साधा खून असावा असेच पोलिसांना वाटत होते. पाणी तपासातून धक्कादायक वास्तव समोर आले. वॉटर प्लांटच्या मालकाला कायमचे संपवण्यासाठी मारेकऱ्यांनी तब्बल ५ लाखांची सुपारी घेतली होती. मात्र, पहाटेच्या अंधारात ओळख न पटल्याने त्यांनी मालक समजून त्यांनी निष्पाप हामजा उस्मान शेख (वय ३९) या कामगाराचा बळी घेतला.

या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा सखोल माग काढण्यात आला. यातून मुख्य आरोपी संतोष मधुकर मांजरे (वय ३७) याला उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली असून संतोष मांजरे सोबत सार्थक संदेश कोहकडे (वय २४), तुषार अजय तोडकर (वय २६), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७) आणि योगेश विलासे इडोळे (वय २८) अशी गजाआड झालेल्या इतर चार आरोपींची नावे आहेत.

तसेच या गुन्हेगारी कटात सामील असलेले पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी उर्फ भैय्या दत्तू जाधव हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, एका जुन्या जमिनीचा वाद मिटवण्यासाठी काही समाजकंटकांनी प्लांटच्या मालकाला कायमचे वाटेतून बाजूला करण्याचा भयानक कट रचला होता. या बेकायदेशीर कामासाठी मारेकऱ्यांना पाच लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. एवढेच नाही तर, त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ स्वरूपात आरोपींच्या हाती पडले होते. ठरलेल्या भीषण योजनेनुसार सर्व मारेकरी पहाटेच्या अंधारात वॉटर प्लांटवर पोहोचले.

नेमक्या त्याच वेळी तिथे कामगार म्हणून काम पाहणारे हामजा उस्मान शेख हे काही कामानिमित्त बाहेर आले. मारेकऱ्यांना वाटले की हाच तो प्लांटचा मालक आहे. कोणतीही शहानिशा न करता, आरोपींनी थेट हामजा यांच्या डोक्यात निर्घृणपणे गोळ्या झाडल्या. या अचानक झालेल्या भयानक गोळीबार घटनेत हामजा यांचा जागीच मृत्यू झाला.

पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.

Vedh News