स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ

स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या ; पोलीस दलात खळबळ
Share

पुणे- पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःजवळील रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ७) दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास औंध येथील परिसरात घडली. 

निलेश भाऊसाहेब पाटील असे या पीएसआयचे नाव आहे. निलेश भाऊसाहेब पाटील हे पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते आणि सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात होती. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांनी स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

निलेश पाटील यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कौटुंबिक वाद, कामाचा ताण की अन्य काही वैयक्तिक कारण, यादृष्टीने पोलीस सध्या सर्व बाजूने तपास करत आहेत.

Vedh News