डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४ लाखांची खंडणी वसुल करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १४ लाखांची खंडणी वसुल करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
Share

पुणे – डॉक्टरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून धमकी देत तब्बल १४ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी रोहिणी सुकुमार खेमाणे (वय ३२, रा. सुघोष अपार्टमेंट, गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय डॉक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार डॉक्टरांचा धानोरीतील भैरवनगर परिसरात दवाखाना आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या ओळखीचा गैरफायदा घेत तिने डॉक्टरांकडे वेळोवेळी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिसांकडे तक्रार करीन आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला कारागृहात जावे लागेल, अशी धमकी तिने डॉक्टरांना दिली. या धमकीला घाबरून डॉक्टरांनी गेल्या महिनाभरात महिलेला १४ लाख ३० हजार रुपये दिले.

दरम्यान, आरोपी महिलेने डॉक्टरांच्या रुग्णालयातील कागदपत्रांची नोंद असलेली वही चोरून नेली. ही वही परत हवी असल्यास आणखी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. सततच्या धमकीमुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी अखेर विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. लोहकरे करीत आहेत

Vedh News