क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात गरोदर महिलेच्या पोटात मारली लाथ अन् माणुसकीला काळिमा..पुण्यातील घटना

पुणे – किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान अजून जगामध्ये प्रवेश न केलेल्या एका निष्पाप जीवाची हत्या करण्यात झाले. ही दुर्दैवी घटना पुण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
या प्रकरणी सज्जाद बबलू मेमन आणि त्याची बहीण सना यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींविरोधात गंभीर दुखापत पोहोचविणे, महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे अशा कलमांनुसार समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी की गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास तक्रारदार तरुण आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी आरोपी सज्जाद भरधाव दुचाकीवरून आला. त्याच्या दुचाकीचं चाक तक्रारदाराच्या पायावरून गेलं. यामुळे तक्रारदाराने सज्जादला जाब विचारला. गाडीला हॉर्न नाही का? असा जाब तक्रारदाराने विचारताच सज्जादला राग अनावर झाला. त्याने चिडून तक्रारदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी तक्रारदार तरुणाची गरोदर पत्नी धावतच आपल्या पतीच्या मदतीसाठी आली. तिने आरडाओरडा करत लोकांकडे मदत मागितली. आसपासचे रहिवासीही मदतीसाठी धावून आले आणि मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी सज्जादची बहीण सना हिने गरोदर महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. यानंतर सज्जादने महिलेच्या पोटात जोरात लाथ मारली.
या मारहाणीने गरोदर पत्नी वेदनेने जमिनीवर कोसळली. तिच्या पोटात दुखायला लागले आणि रक्तस्त्रावही सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ससून रुग्णालयात पाठवले. मात्र, दुर्दैवाने महिलेच्या पोटातील बाळाचा जगात येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, महिलेचा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर महिलेच्या पतीने या घटनेनंतर समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
उपनिरीक्षक तानाजी शेगर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






