नशेमध्ये झाला मित्राशी वाद ; रागाच्या भरात मित्राचा खून करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर

पुणे- नशा करताना झालेल्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून खून केला. पुण्यातील काशेवाडी परिसरात शुक्रवारी (दि. ३ ) रात्री साडेआठ वाजता महात्मा फुले मित्र मंडळाजवळ ही घटना घडली. मित्राचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला.
आकाश पाटोळे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अजय ऊर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला अटक करण्यात आली असून रुपाली प्रमोद पाटोळे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटोळे या भवानी पेठेतील जुना मोटार स्टॅन्ड भागात शेंगा आणि कणीस विक्रीची गाडी लावतात. शुक्रवारी रुपालीचा दीर आकाश हा आपल्या घरी झोपला होता. संध्याकाळी झोपेतून उठून आंघोळ करून घरी बसला असताना त्याचे मित्र शंभू आणि आबिद घरी आले. दोघांसोबत तो रात्री साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडला.
त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास काशेवाडी परिसरात वजन काट्याजवळ असलेल्या एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याची माहिती एकाने रुपाली पाटोळे यांना दिली. रुपाली या घटनास्थळी गेल्या असता आकाश हा बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यानंतर रुपाली या खडक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यावेळी आकाशच मित्र अजय ऊर्फ चोर राजा सुखदेव शिंदे हा पोलीस ठाण्यात आला होता. त्याने नशा करताना झालेल्या वादातून अक्षाच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारून त्याचा खून केल्याची कबुली त्याने दिली. खून करून कपडे बदलून तो पोलीस ठाण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.






