तोंडात, डोळ्यात तिखट टाकले ; बापानेच आपल्या मुलीला पुण्यात संपवून साताऱ्याच्या हद्दीत मृतदेह फेकला

पुणे – पुण्यातील १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावर १४ सप्टेंबर रोजी आढळून आला होता. सलग १६ दिवस कसून तपास करून या तरुणीच्या हत्येचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सख्ख्या बापाने आणि चुलत चुलत्याने मिळून मुलीचा पुण्यात खून करून तिचा मृतदेह सातारा हद्दीत फेकल्याचे उघड झाले आहे. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हर्षदा हणमंत जाधव (वय १९, रा. जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, पुणे; मूळ रा. सोलापूर) असे मृत तरुणीचे नाव असून या प्रकरणी वडील हणमंत दामोदर जाधव (रा. जांभुळवाडी (रा. आंबेगांव खुर्द, ता. हवेली, जि.पुणे) आणि चुलत काका बाळू अंकुश जाधव (रा. प्रगतीनगर-इंदोरी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करायची, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरायची, व्यसन करायची. घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी द्यायची. मुलीच्या या वर्तणुकीमुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा पणाला लागल्याचा राग वडिलांच्या मनात धुमसत होता. सततच्या वादाला आणि समाजात होणाऱ्या बदनामीला कंटाळून अखेर बाप आणि चुलत्याने हर्षदाचा काटा काढण्याचा कट रचला.
वडील आणि चुलत चुलत्याने हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने तिला गाडीतून घराबाहेर नेले. डोळ्यात-तोंडात मिरची चटणी टाकून व श्वास रोखून तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्याच गाडीतून मृतदेह साताऱ्याच्या हद्दीत शिरवळ-राजेवाडी मार्गावर नेऊन टाकून दिला.
मृताची ओळख पटविणारा कोणत्याही प्रकारचा धागादोरा नसताना घटनास्थळापासून पुणे, भोर बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहाणी केली. भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर, सातारा पुणे हायवे भागात खबऱ्याकडून माहिती काढली. तांत्रिक तपासाद्वारे वाहनाचा माग काढुन संशयित आरोपी निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.





