मुंढवा येथे कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पती, सासु, सासरे, नणंद, आज्जे सासुवर गुन्हा

मुंढवा येथे कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पती, सासु, सासरे, नणंद, आज्जे सासुवर गुन्हा 
Share

पुणे – फ्लॅट खरेदी करण्यासाठी व घटस्फोटासाठी दबाव टाकून होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन मुंढवा पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

त्रिष्णा बाळकृष्ण निकम (वय ३३, रा. व्यंकटेश ग्राफिटी सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिच्या वडिलांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ (वय ३५, रा. सैनिक निवास डिफेन्स कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर), वैशाली संजय सकपाळ , संजय मनोहर सकपाळ, शैली संजय सकपाळ, शकुंतला साळुंके (सर्व रा. सैनिक निवास, डिफेन्स कॉलनी, गोंधळेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केशवनगर येथील व्यंकटेश ग्राफिटी सोसायटी येथे २९ सप्टेंबर रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी त्रिष्णा निकम हिचा राहुल संकपाळ याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर तिचे पती, सासु सासरे, नणंद, आज्जी सासु यांच्याकडून तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यांनी वारंवार पैशासाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी व व्यंकटेश ग्राफिटीमधील फ्लॅट नावावर करुन देण्यासाठी त्रास दिला जात होता.

या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली होती. त्यांचा घटस्फोटाचा दावा सुरु होता. तिला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकून शारीरीक व मानसिक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा निमकर तपास करीत आहेत.

Vedh News