खंडाळा एक्झिट येथे दुचाकीस्वाराकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले ; महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन जवानांवर गुन्हा

लोणावळा – पोलीस असल्याचे भासवून कारवाईची धमकी देत दुचाकीस्वाराकडून ऑनलाईन १००० रुपये बकायदेशीरपणे वसुल करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन जवानांवर लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश अशोक साळुंखे, रोहीदास बदाम पाटील आणि राजेश सूर्यकांत केंद्रे अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन एमएसएफ (MSF) जवानांची नावे आहेत. ही घटना १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास खंडाळा एक्झिट येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथे राहणारे एक शिक्षक विक्रमसिंह मोतीसिंह रघुवंशी (वय ३३, रा. कल्याण मूळ रा.भोपाळ मध्यप्रदेश ) आपल्या पत्नीसह बुलेटवरून खंडाळा एक्झिटवरून जात होते. यावेळी तिथे तैनात असलेल्या या जवानांनी त्यांना अडवले आणि तुम्ही या मार्गांवरून दुचाकी चालवण्यास बंदी आहे असे सांगून सहा हजार दंड, वाहन जप्ती आणि वाहनचालक परवाना निलंबित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे.
त्यानंतर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ऑनलाईन QR कोड स्कॅन करून ₹१,००० ची मागणी केली व ती रक्कम वसूल केली.
पैसे दिल्यानंतर पीडित व्यक्तीने स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, त्यांना कळाले की ते ट्रॅफिक पोलीस नसून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) कर्मचारी आहेत, ज्यांना दंड वसूल करण्याचा कोणताही अधिकार नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. लोणावळा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिन्ही जवानांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२६(२), ३०८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.






