आळंदीवर शोककळा! दिवेआगर दुर्घटनेच्या निषेधार्थ आज आळंदी बंदचे आवाहन

आळंदीवर शोककळा! दिवेआगर दुर्घटनेच्या निषेधार्थ आज आळंदी बंदचे आवाहन
Share

आळंदी – रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आळंदीतील एका खाजगी अकॅडमीच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज (२ ऑक्टोबर २०२६) आळंदी बंद ठेवण्याचे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले आले आहे. या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण आळंदी शहरावर आणि मृत विद्यार्थ्यांच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेनंतर रात्रीपासून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एरवी भाविकांच्या हरीनामाने दुमदुमणारी अलंकापुरी आज शोकमग्न झाल्याचे दिसून येत आहे.

अकॅडमीचे कार्यालय बंद करून तिथले लोक पसार झाल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अकॅडमीच्या बेजबाबदारपणावर आणि निष्काळजीपणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पालकांचे संमतीपत्र घेतलेले असले तरीही प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिक्षकांचे मुलांकडे का लक्ष ठेवले नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

आळंदी येथे मरकळ रस्त्यावर ही अकॅडमी आहे. या ठिकाणी वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीचे वर्ग घेतले जातात.

या कोचिंग क्लासचे ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक (एकूण ४४ जण) दिवेआगर येथे गुरुवारी सहलीसाठी आले होते. यामध्ये १७ मुली आणि २५ मुलांचा समावेश होता. हे सर्व विद्यार्थी इयत्ता ११ वी आणि १२ वी सायन्सचे होते. समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेत असताना काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक समुद्राच्या तीव्र प्रवाहात ओढले गेले आणि बुडाले.

Vedh News