महत्वाची बातमी : दिवेआगर येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

महत्वाची बातमी : दिवेआगर येथे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Share

दिवेआगार- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आज (दि. १ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासचे विद्यार्थी होते.

प्राथमिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासचे ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक (एकूण ४४ जण) दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. यामध्ये १७ मुली आणि २५ मुलांचा समावेश होता. हे सर्व विद्यार्थी इयत्ता ११ वी आणि १२ वी सायन्सचे होते. समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेत असताना काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक समुद्राच्या तीव्र प्रवाहात ओढले गेले आणि बुडाले.

यश किरण वानखेडे, ⁠सोहम तुकाराम भांडवलकर, ⁠तन्मय दत्तात्रय वाहिले, कौस्तुभ संदीप दौंड, कैवल्य वासनकर, ⁠राजवीर वहिले, प्रणव बनसोडे, ⁠सुमित अहिरे, अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेत आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून या सर्व विद्यार्थ्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर विद्यार्थी आणि शिक्षकदेखील याच आरोग्य केंद्रावर असल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Vedh News