शिरूरमध्ये पहाटे गोळीबार ; वॉटर फिल्टर प्लान्टवर काम करणाऱ्या कामगाराची हत्या

शिरूर – पाण्याच्या फिल्टर प्लॅंटवर काम करणाऱ्या एका ३९ वर्षीय कामगाराचा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी डोक्यात गोळी झाडून खून केला. शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला हा साधा अपघात किंवा चक्कर येऊन पडल्याचा प्रकार वाटत होता. परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल तपासनानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
हंमजा शेख (वय ३९) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंमजा शेख हे कारेगाव येथील साईनगर भागात ‘समू एंटरप्रायजेस ॲक्वा रिच’ या पाण्याच्या प्रकल्पावर कामाला होते. मंगळवारी पहाटे ६:१५ च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे घरातून खाली प्लँट चालू करण्यासाठी आले. ते जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करत असतानाच, अचानक दुचाकीवरून दोन अज्ञात इसम तिथे आले. गाडीवर मागे बसलेल्या इसमाने खाली उतरून थेट प्लँटच्या दारात जाऊन हंमजा यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूने गोळी झाडली. ही गोळी डोक्याच्या वरील बाजूने थेट आरपार निघून गेली आणि हामजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिकांना हा आवाज फटाक्यासारखा वाटला.
घटनेनंतर शेजारील महिलेने हामजा यांच्या पत्नीला पती रक्ताळलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हा अपघाताचा प्रकार वाटल्यामुळे रांजणगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केल्यानंतर त्यांना तिथे बंदुकीच्या गोळीचं रिकामे काडतूस सापडले. संशय बळावल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पुन्हा बारकाईने पाहणी केली असता, डोक्याला गोळीचे स्पष्ट छिद्र आढळून आले.






