चिखलीत बॅटरी संशोधन केंद्र होणार ; ८०० कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक

चिखलीत बॅटरी संशोधन केंद्र होणार ; ८०० कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक
Share

पिंपरी- सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (COEP) आणि जेएसडब्ल्यू प्रोजेक्ट्स (JSW Projects) यांच्यात चिखली येथील रिसर्च पार्कमध्ये स्वदेशी बॅटरी संशोधन व विकास केंद्र उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. ८०० कोटी रुपयांहून अधिक प्रस्तावित गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

या प्रकल्पाचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी स्वागत केले आहे. याबाबत माहिती देताना महेश लांडगे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात उद्योग, संशोधन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. चिखलीतील हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षमतेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवडला शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, सीओईपी आणि आयआयएम नागपूर यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या स्वदेशी बॅटरी संशोधन केंद्रामुळे शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेल्याचे आमदार लांडगे यांनी नमूद केले.

या करारावर सीओईपीतर्फे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे आणि जेएसडब्ल्यू समूहातर्फे कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या भागीदारीबद्दल बोलताना जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले, “सेल हे या शतकातील नवीन इंधन असून हे सेल भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे. सीओईपीसोबतची ही भागीदारी उद्योग, संशोधन आणि शिक्षण क्षेत्राला नवा आयाम देईल.”

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये-

प्रगत संशोधन- प्रस्तावित केंद्रात लिथियम-आयन, सोडिअम-आयन आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी सेलचे संशोधन, प्रोटोटायपिंग व प्रमाणीकरण (Validation) केले जाईल.

रोजगारनिर्मिती- हा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जाणार असून, यातून सुमारे १,००० रोजगारसंधी निर्माण होण्याचा अंदाज आहे.

विद्यार्थ्यांना संधी- स्थानिक विद्यार्थी आणि युवा अभियंत्यांना अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानावर थेट काम करण्याची व प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होईल.

Vedh News