पुणे – आपण विद्यार्थी आहोत आपले विमान निघून गेले आहे. गावी जाण्यासाठी पैसे नाहीत असे सांगून प्रवाशांकडून पैसे घेऊन फसवणूक करणार्या एका भामट्याला सी आय एस एफच्या गुप्तचर विभागाने रंगेहाथ पकडले.
मोदेला व्यंकटा दिनेशकुमार (वय २८, रा. रत्नपुरी कॉलनी, मल्लिकार्जुन पेठ, गुंटुर, आंध्रप्रदेश) असे या भामट्याचे नाव आहे. याबाबत सी आय एस एफ युनिटचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम मुन्निदर सिंह (वय ३७, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. ही घटना विमानतळ परिसरात २४ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमानतळावर सी आय एस एफमध्ये गुप्तचर शाखा येथे नोकरी करतात. १ सप्टेंबर रोजी विमानतळावरुन बाहेर पडावयाच्या गेट जवळ एकाने तो विद्यार्थी असल्याचे सांगून मुळ गावी जाण्याकरीता बुक केलेले विमान निघून गेले असल्याचे सांगून पुन्हा विमानाचे तिकीट काढण्याकरीता पैशांची गरज आहे. घरी पोहचताच पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन प्रवाशांकडून १८ हजार ६०० रुपये व १२ हजार रुपये घेतले होते. आता तो पैसे परत करत नसल्याच्या तक्रारी विमानतळ प्राधिकरणाकडे आल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश फिर्यादी यांना वरिष्ठ अधिकार्यांनी दिले होते.
२४ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजता त्यांचे सहकारी उपनिरीक्षक ऋषिकेश गुर्जर हे दैनंदिन कर्तव्याकरीता विमानतळ प्रस्थान गेट १ येथून जात असताना त्यांना एक जण दुसर्याकडून संशयास्पदरित्या पैसे घेत असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती फिर्यादी यांना दिली. फिर्यादी हे तातडीने तेथे गेले असताना . तो भामटा प्रवाशाकडून ऑनलाईन स्वरुपात पैसे घेत होता. त्यांची चौकशी केल्यावर त्याने हैद्राबादला जाणारे विमान निघून गेले असून त्याला हैद्राबादला जाणे गरजेचे आहे, असे सांगून तेलंगणा येथील श्रीकांत दान्नय्या मोटे यांच्याकडून ११ हजार रुपये घेतले असल्याचे दिसून आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुरल विद्यापीठाचे ओळखपत्र दाखविले. त्यावर त्याचे नाव अल्लुरु शाम प्रसाद असे नाव असल्याचे दिसून आहे. ते ओळखपत्र बनावट असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे आधार कार्ड मागितले. आधार कार्डावर मोदेला व्यंकटा दिनेशकुमार असे नाव असल्याचे दिसून आले. प्रवाशांना बनावट ओळखपत्र दाखवून खोटी माहिती सांगून त्यांची फसवणूक करुन पैसे घेणारा हाच असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मोदेला याला विमानतळ पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहेत.
