ब्रेकिंग न्यूज

पुण्यात विसर्जन रथामुळे अडकली रुग्णवाहिका; रुग्णाला स्ट्रेचरवरून भर रस्त्यातून नेण्याची नामुष्की 

Share

पुणे – रस्त्याच्या मधोमध गणपती मंडळाचा रथ अडकला आणि त्याचवेळी तिथे आलेल्या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास रस्ता नसल्यामुळे अखेरीस रुग्णाला स्ट्रेचरवरून न्यावे लागले. हा प्रकार शास्त्री रस्त्यावर पूना हॉस्पिटलच्या गल्लीत घडला. घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मंडळांचे रथ रांगेला लागण्यासाठी लक्ष्मी रस्ता, मंडई परिसरात निघत आहेत. लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर पूना हॉस्पिटलच्या गल्लीमधून एका मंडळाचा विसर्जन रथ बाहेर पडत असताना हा रथ तेथे अडकून पडला. त्यावर लावलेल्या साऊंड बॉक्समुळे पूर्ण रस्ता बंद झाला.

त्याचवेळी तेथे रुग्णवाहिका आली, पण या रुग्णवाहिकेला आतमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता. रुग्णाला तातडीने दाखल करणे आवश्‍यक होते. अखेर रुग्णवाहिका चौकातच थांबवून ठेवण्यात आली. तेथेच स्ट्रेचरसह रुग्णाला बाहेर काढले आणि खड्डे असलेल्या रस्त्याने हे स्ट्रेचर ढकलत रुग्णाला दाखल करावे लागले. सुदैवाने रुग्ण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर नसल्याने मोठा धोका निर्माण झाला नाही. परंतु मंडळाच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना दिव्य प्रसंगातून जावे लागले.

घडलेल्या प्रकारामुळे गणेशोत्सवाच्या काळात हॉस्पिटलजवळचे रस्ते तरी मोकळे ठेवाल का असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.