राजगुरूनगर- खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथे बेजबाबदारपणे थार कार चालवत पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, रा. आरग, ता. मिरज, जि. सांगली) असे या बेदरकार थार चालकाचे नाव सून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, सुखदेव नाईक याने त्याच्या ताब्यातील थार गाडी (एमएच ०८ बीजी ६९८४) मोशी ते चाकण तसेच चाकण चौक ते शिक्रापूर मार्गावर निष्काळजीपणे चालवत होता. या वेळी त्याने काही वाहनांना धडक देऊन त्यांचे नुकसान केले. या घटनेत अविनाश गोविंद मोरे (वय २०, रा. मेदनकरवाडी) यांच्या तोंडाला किरकोळ दुखापत झाली.
त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीने त्यांच्या अंगावर थार घालण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी बाजूला झाले. त्यानंतर आरोपीने सरकारी वाहनाला धडक दिली. वाहन वळवून पुन्हा पोलिसांच्या दिशेने भरधाव वेगाने थार नेऊन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे तसेच सरकारी वाहनाचे नुकसान झाले असून, फिर्यादी पोलीस शिपाई निरोज शेख यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली.
या संदर्भात पोलीस शिपाई निरोज शेख यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत
