ब्रेकिंग न्यूज

पिंपरीतील यशादा फ्लोरेंझा सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणीचा’, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

पिंपरी – पिंपरी गावातील यशादा फ्लोरेंझा को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. सोसायटीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाचे आयोजन यशादा फ्लोरेंझा सोसायटीचे चेअरमन ॲड. उमेश खंदारे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. प्रसिद्ध कलाकार चंद्रकांत नगरकर यांनी आपल्या खास शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत विविध मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा आणि गंमतीदार उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सोनाली खंदारे, ज्योती उदासी, स्वाती सोनवणे, शलाका कदम, भाग्यश्री देठे, विनेश आहूजा, अमृता आसबे, योगेश सोनवणे, राहुल खैरनार, नारायण पाटील, नितीन आसबे, विनिश आहुजा यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘खेळ पैठणीचा’मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विविध फेऱ्यांमध्ये आपले कौशल्य आणि उत्साह दाखवला. अखेरच्या फेरीत सुषमा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी जिंकली. वर्षा मोहनानी यांनी द्वितीय तर काजल उदासी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे सहभागी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणासोबतच महिलांना विरंगुळा, मनोरंजन आणि एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, तसेच सोसायटीतील सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे यशादा फ्लोरेंझा सोसायटीतील गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली असून, सहभागी महिलांनी आयोजकांचे आणि नियोजन टीमचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी सोसायटीचे चेअरमन ॲड. उमेश खंदारे यांनी सर्व विजेते, स्पर्धक व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.