उरुळी कांचन- कर्तव्य बजावून पोलीस ठाण्यातून बाहेर पडलेल्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस फौजदाराचे अपघाती निधन झाले. गणेश रतन दाभाडे (वय ४९) असे त्यांचे नाव असून भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर, ग्रीन पार्क हॉटेलजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक फौजदार दाभाडे हे पोलीस ठाण्यातून बाहेर पडून पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी अतिशय वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दाभाडे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मृत गणेश दाभाडे हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी होते. २००१ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होते. पुणे ग्रामीण पोलीस दलात विविध ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर ते सध्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी समजताच पोलीस ठाण्यात आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
