पुणे- पुणे जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवादरम्यान १२ दिवसांच्या दारूबंदीचा आदेश काढला होता. मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गणेशोत्सवादरम्यान पुणे जिल्ह्यातील सलग १२ दिवसांची दारूबंदी राज्य सरकारकडून अखेर मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकर मद्यप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता केवळ दोनच दिवस संपूर्ण दिवसभर दारूबंदी लागू राहणार आहे.
१२ दिवसांच्या दारूबंदीविरोधात हॉटेल मालकांच्या संघटनेने आणि वाईन शॉप मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने विचारले की संपूर्ण राज्यातून फक्त पुण्याचेच निवड का केली ? केवळ पुण्यातील लोकच दारू प्यायल्यावर चुकीचे वागतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का ? या निर्णयाने प्रशासनाने पुण्याची प्रतिमा मलीन केली आहे. प्रत्येक मद्यपान करणारी व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, असे नाही.
ब्लँकेट बॅनमुळे नियमित मद्यपान करणाऱ्यांना आरोग्याच्या गंभीर समस्या होऊन तसेच रुग्णालयांत गर्दी होऊ शकतेअसे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुठल्याही तर्काशिवाय असे ब्लँकेट आदेश देता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट केले. तसेच निर्णय मागे न घेतल्यास आम्ही हा निर्णय मागे घेण्याचे आदेश देऊ असेही न्यायालयाने सुनावले आहे.
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गणेशोत्सवाच्य दरम्यान पुणे जिल्ह्यातील सलग १२ दिवसांची दारूबंदी राज्य सरकारकडून अखेर मागे घेण्यात आली आहे. आता केवळ गणेश चतुर्थी, १४ सप्टेंबरच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत आणि आणि अनंत चतुर्दशी, २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर दारूबंदी लागू राहणार आहे.
