ब्रेकिंग न्यूज

श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध ; माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही

Share

भीमाशंकर- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थान असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या विकासासाठी विकास आराखडा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची पाहणी करुन बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला.

नवीन आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या निगडाळे परिसरातील वाहनतळ, बसस्थानक, विविध नागरी सुविधा आणि भक्तनिवास याबाबत वळसे पाटील यांनी सविस्तर माहिती घेतली. ही कामे जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या. तसेच, भीमाशंकर गाव नवीन ठिकाणी वसविण्याच्या कामाचाही या आराखड्यात समावेश आहे. या नवीन ठिकाणी घरांची रचना कशी असावी, गावाची रचना कशी असावी आणि आवश्यक नागरी सुविधा कोणत्या असाव्यात, याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

भविष्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता निगडाळे व गोठेवाडी येथील तलावांसोबतच पेगुंगण तलावाची क्षमता वाढविण्याचे कामही नवीन आराखड्यात समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. सध्या अस्तित्वात असलेल्या राजगुरुनगर–भीमाशंकर तसेच मंचर-तळेघर-भीमाशंकर या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या विकास आराखड्याची प्रभावी आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी झाल्यास श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून परिसराच्या अर्थकारणाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक आदिवासी बांधवांच्या उन्नतीला, परिसराच्या सर्वांगीण विकासाला आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल. याच भावनेतून श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. यापुढेही या सर्व कामांवर बारकाईने लक्ष ठेवून ती दर्जेदार, गतिमान आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असे ते म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी श्रीमती अर्चना तांबे, तहसीलदार राहुल सारंग, कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, वास्तुविशारद हेमंत पाटील, कार्यकारी अभियंता श्रीमती. श्रुती नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता गवारे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, विश्वस्त गोरक्ष कौदरे, मृण्मय बाबाजीशेठ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.