ब्रेकिंग न्यूज

सांगवीमध्ये दहीहंडी उत्सवानंतर लोखंडी सांगाड्याचा भाग अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Share

पिंपरी- सांगवीतील शिंदेनगर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ दहीहंडी उत्सवानंतर स्टेजचे डेकोरेशन उतरवत असताना लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक कोसळला. या घटनेत एका ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते. याचवेळी लोखंडी सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा यांच्या डोक्यावर कोसळला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेमागील नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत तपास सुरू आहे. या घटनेनंतर आयोजकांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या होत्या का असा प्रश्न विचारला जात आहे. पोलिसांच्या कारवाईवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुटुंबीयांची पोलिसांकडे तक्रार देण्यास नकार ?

मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत असून कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मंडळातील इतर मुलांना किंवा तरुणांना अडचणीचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. परंतु या गंभीर आणि अपघाती घटनेची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घ्यावा अशी विनंती कुटुंबीयांनी केल्याचे बोलले जात आहे.