पुणे- प्रिन्सिका जोशी नावाने मुलीच्या आवाजात कॉल करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल दीड लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार तब्बल सात महिने सुरु होता.
कुणाल जितेंद्र अदमाने (वय-२५, रा. पर्वती परिसर) असे या भामट्याने नाव आहे.
तक्रारदाराच्या स्नॅपचॅट खात्यावर ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाने मुलीच्या नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तक्रारदाराने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवरून नियमित संवाद सुरू झाला. दरम्यान, तब्बल सात महिने हे संभाषण सुरू होते. विश्वास निर्माण झाल्यानंतर ‘प्रिन्सिका’ नाव सांगणाऱ्या या भामट्याने क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा आणि आकर्षक परतावा मिळतो, असे सांगत फिर्यादीकडून सुमारे दीड लाख रुपये क्रिप्टो वॉलेटवर रक्कम स्वीकारली.
मात्र काही काळानंतर गुंतवणुकीचा परतावा आणि पैसे परत मिळण्याबाबत विचारणा सुरू केल्यावर संपर्क टाळण्यास सुरुवात केली. नंतर ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाचे स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम खाते बंद झाले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी Crypto Transaction चा माग काढून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी हा उच्चशिक्षित असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. ही कामगिरी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक शरद शेळके, पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासाहेब चव्हाण यांच्या पथकाने केली.
