पिंपरी – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदी घातलेल्या प्रखर लेझर आणि बीम लाईटचा वापर केल्या प्रकरणी सांगवी येथील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाला कोर्ट उठेपर्यंतची शिक्षा आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बजरंग विनायक लकडे (वय ३४, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख) असे शिक्षा सुनावलेल्या मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. पिंपळे निलख येथील जय भवानी मित्र मंडळाचा तो अध्यक्ष आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. तरीदेखील ५ सप्टेंबर २०२५ च्या रात्री गणेशनगर चौक ते मेन बस स्टॉप, पिंपळे निलख यादरम्यान आयोजित विसर्जन मिरवणुकीत जय भवानी मित्र मंडळ यांच्याकडून प्रखर बीम आणि लेझर लाईटचा वापर करण्यात आला.
डोळ्यांना गंभीर दुखापत पोहोचवू शकणाऱ्या या लाईटचा वापर करून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळ अध्यक्ष याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सांगवी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पिंपरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावणीनंतर आरोपी बजरंग लकडे याला दोषी ठरवत ३ सप्टेंबर २०२६ रोजी दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली.तसेच, दंड न भरल्यास दोन दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
