मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे.
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचाही संशयास्पद मृत्यू झाला. दिशाने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी निष्कर्षात केला. मात्र, ‘तिचा मृतदेह इमारतीपासून दहा फूटांवर आढळला. ही बाब आत्महत्येच्या दाव्याशी सुसंगत नाही,’ असा युक्तिवाद करून दिशाच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासाविषयी संशय उपस्थित केला होता.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता.
आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर दिशाच्या वडिलांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. “कोणालाही आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, फक्त जबाब नोंदवा. तपास करून योग्य तो निष्कर्ष काढा, मग आरोपपत्र दाखल करा,” असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
