डीजे विरोधात रान पेटले! आणखी एका पुणेकरांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद
पुणे – गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच पुणेकरांनी डीजे विरोधातील आपला आवाज आणखी तीव्र करण्यास सुरुवात केली आहे. विद्यानंद बापट यांच्या बरोबर आता शरद केळकर नावाची व्यक्ती मैदानात उतरली आहे. केळकर यांनी थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात राहणारे शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
एवढेच नाही तर आयोगाने मागील वर्षभरात पुण्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कोणती ठोस कारवाई करण्यात आली, यंदाच्या गणेशोत्सवात कोणत्या मंडळांना ध्वनिवर्धक अथवा डीजे वापरण्यास परवानगी देण्यात येणार आहे, याचा संपूर्ण सविस्तर अहवाल येत्या सात दिवसांच्या आत सादर करण्याचे कडक निर्देश आयोगाने दिले आहेत.
डीजेचा दणदणाट असो वा कर्णकर्कश ढोल-ताशे, उत्सवाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याशी तडजोड कितपत योग्य? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून विद्यानंद बापट आणि शरद केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
