ब्रेकिंग न्यूज

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आक्रमक, जोरदार राडा, पोलिसांना पाचारण 

Share

पुणे – वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा केल्याचा प्रकार सोमवारी घडला.  

हाती आलेल्या माहितीनुसार विशेष परीक्षा देऊनही काही विद्यार्थी पुन्हा नापास झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती होती. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

या आंदोलनात राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि एका प्राध्यापकामध्ये वाद झाला. प्राध्यापकाने प्रथम विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर उपस्थित काही जणांनी संबंधित प्राध्यापकाला मारहाण केल्याची चर्चा आहे. परिस्थिती अधिक चिघळल्याने शेवटी आता घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

दरम्यान, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडून प्रतिक्रिया देताना सांगण्यात आले की युनिव्हर्सिटी सदैव विद्यार्थी हीत जोपासत आलेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी या वर्षी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी संवाद साधला होता. विशेष परीक्षेमध्ये काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांना बाहेरच्या काही संघटनेने एमआयटी प्रशासनाच्या विरोधात भडकवण्याचे काम केले, जे अतिशय निंदनीय आहे. असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.