मुंबई- मुंबईतील चेंबूर परिसरातील म्हैसूर कॉलनी आणि वाशीनाका भागात मोनोरेल स्टेशनजवळ एका केमिकल टँकरमधून बेंझीन (Benzene) या घातक रसायनाची गळती झाल्याची घटना ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री घडली. या गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास आणि डोळ्यांची जळजळ जाणवू लागल्यामुळे घबराट पसरली.
प्राथमिक माहितीनुसार, टँकर क्रमांक GJ 05 CU 9629 च्या बॉटम वाल्व्हमधून (Bottom valve) बेन्झीन रसायनाची गळती सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, बी पी सी एल चे तज्ज्ञ पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित बचावकार्य सुरु करून गळती थांबवली. गळती झालेल्या टँकरमधील रसायन दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये सुरक्षितपणे भरण्यात आले (Decanting) आणि दोन्ही टँकर BPCL रिफायनरी परिसरात हलवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील वाहतूक काही अंतरापर्यंत थांबवण्यात आली होती व ५०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
