मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर पक्षाकडून नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
यामध्ये जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे, डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असणार आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द केल्या होत्या. ४ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत पक्षाकडून पत्रक जारी करण्यात आले होते.
