श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून महिलेचे दागिने चोरीला; भरदिवसा घडला प्रकार
पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड, सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन हजारांची रोकड आणि सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, तसेच रविवार पेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरुन नेण्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत.
आणखी एका घटनेत, पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरटे आता उघड्या दरावाजातून आत शिरत घरातून किंमती ऐवज चोरू लागले आहेत. चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील नागरिक झोपेत असताना, तसेच घरातील वृद्ध महिला एकटी असताना चोरट्यांनी ही कृत्ये केली आहेत.
