पुणे- पुण्यात येत्या सोमवारी ( दि. ३१) बी भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती भाजपचे महामंत्री राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपची इतकी ताकद असतानाही पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आता भाजपने कंबर कसली आहे असे बोलले जात आहे.
दिवसभर चालणाऱ्या या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या प्रदेश कार्यकारिणी बैठकीला भाजपच्या संघटनेतील विविध स्तरांवरील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रदेशातील सर्व पदाधिकारी, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष तसेच मंडल अध्यक्ष यांच्यासह पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील प्रमुख पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या काळातील ही पुण्यातील पहिलीच कार्यकारिणी बैठक असणार आहे.
राजेश पांडे म्हणाले की “महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस हे विकसित महाराष्ट्रासाठी तरुणांना कशी साद घालतायत आणि त्यामुळे विकसित महाराष्ट्राच्या संकल्पामध्ये तरुणांचा सहभाग असावा, यासाठी विशेष उपक्रम, कार्यक्रम आणि नियोजन हे नक्की या बैठकीच्या माध्यमातून मिळणार आहे”
प्रदेश कार्यकारिणीच्या या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर केले जाणार आहेत. त्याचबरोबर आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि पक्षाच्या पुढील वाटचालीचे नियोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
