‘देवाभाऊ… माझ्या नणंदेला न्याय द्या’ शिल्पा गवारेच्या भावजयीची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
पिंपरी – सासरच्या छळाला कंटाळून शिल्पा गवारे या ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना वाकड येथे गुरुवारी घडली. आपल्या नणंदेला न्याय मिळावा यासाठी शिल्पाची भावजय स्नेहा कलाटे यांनी फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले.
“देवाभाऊ… आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला देवाभाऊ म्हटलं जातं. आज तुम्ही आम्हाला न्याय द्यावा,” अशी आर्त हाक स्नेहा कलाटे यांनी दिली आहे. माझ्या नणंदेवर खूप अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेऊन “हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू आणि आरोपींना कठोर शिक्षा करू. तुम्ही काळजी करू नका” असे आश्वासन शिल्पाच्या माहेरच्या लोकांना दिले आहे.
माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून शिल्पा गवारे यांचा छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासरा, सासू आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये, विवाहित महिलांवरील छळाच्या घटना गंभीर असून, अशा प्रकरणांमध्ये कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
