ब्रेकिंग न्यूज

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत मुन्नाभाईंची हायटेक कॉपी

Share

पुणे- परीक्षेत कॉपी करण्यासाठी कोण काय डोके लढवेल हे काही सांगता येत नाही. सध्याचा जमाना हायटेक आहे, त्यामुळे कॉपी करणारा किंवा परीक्षेत घोटाळे करणारे महाभाग अशाच हायटेक साधनांचा वापर करताना दिसून येतात. असाच प्रकार पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत झाल्याचे उघडकीस आले आहे.

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा कक्षातील प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेरा लावलेल्या चष्म्यातून बाहेर पाठवून कॉपी केल्या प्रकरणी तीन उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना मदत करणाऱ्या परीक्षा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांवरही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासन आणि ‘आयबीपीएस’ (IBPS) संस्थेने सलग दीड महिना फॉरेन्सिक तपास करून या घोटाळेबाजांना तुरुंगात पाठवले आहे. एकूण २०,७३५ उमेदवारांच्या ऑनलाईन लॉगशीटचा तांत्रिक तपास करताना, छत्रपती संभाजीनगर येथील ‘आयकॉन डिजिटल झोन चिखलठाणा’ केंद्रावरील तीन उमेदवारांची उत्तरे सोडवण्याची पद्धत अत्यंत संशयास्पद आढळली. पहिला अर्धा तास तिन्ही उमेदवारांनी केवळ स्क्रीनवरील प्रश्न वाचले आणि नंतर ते स्वच्छतागृहात (Toilet) गेले. शेवटचा अर्धा तास राहिला असताना स्वच्छतागृहातून परत आल्यानंतर तिन्ही उमेदवारांनी रफशीटचा कोणताही वापर न करता ३० मिनिटांत वेगाने १०० प्रश्न सोडवले. यातील ९० पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे थेट अचूक आली आणि ते गुणवत्तेत पात्र ठरले. त्यावरून संशय बळावला आणि तपासणीअंती हा घोटाळा उघडकीस आला.