पुणे- पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला नवीन चालना मिळाली असून शिरूर आणि खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टर क्षेत्रावर भव्य नवीन एमआयडीसी (MIDC) उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. या नवीन औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिकृतपणे जमीन संपादनाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे.
पाबळ-धामारी परिसरातील एकूण ७४३ हेक्टर (सुमारे १८३६ एकर) जमिनीवर ही वसाहत उभी राहणार आहे. शिरूर आणि खेड तालुक्यांचा हा सीमावर्ती भाग प्रामुख्याने कमी पावसाचा आणि दुष्काळी मानला जातो. या एमआयडीसीमुळे येथील अर्थकारणाला मोठी चालना मिळेल. या नवीन एमआयडीसीला उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अनेक मोठे रस्ते प्रकल्प मंजूर झाले आहेत. तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ५३.४ किमी लांबीचा ६ पदरी उन्नत मार्ग बांधण्यात येणार असून त्यामुळे पुणे शहर आणि चाकण-नगर रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक कोंडी ७० ते ८० टक्क्यांनी कमी होईल. येथील कंपन्यांना शहरातून न जाता मालवाहतूक बाहेरच्या बाहेर करता येईल
प्रशासकीय आदेशानुसार, या भागातील संबंधित शेतजमिनींच्या सातबारा उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ (Acquisition-notified area) असा शेरा टाकण्याची प्रक्रिया थेट गाव पातळीवर सुरू झाली आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास होण्याची शक्यता आहे. जमीन संपादनाची प[उधील प्रक्रिया कशा पद्धतीने होणार, मोबदला किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
