ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूची लागण ? तब्बल २,२६१ घरांमध्ये आढळल्या डासांच्या अळ्या

Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने धडक कारवाई करत केलेल्या सर्वेक्षणात तब्बल २,२६१ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. शहरात डेंग्यूची लागण झालियाची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जूनपासून शहरात कंटेनर सर्व्हे सुरू असून यादरम्यान २ लाख ९४ हजार १८६ घरांची आणि १४ लाख ५२ हजार ७२५ पाण्याच्या भांड्यांची / कंटेनरची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान २,२६१ घरामधील २,४२८ कंटेनरमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ४० आणि मलेरियाचे १९ बाधित रुग्ण नोंदले गेले आहेत.

ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणासारखी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधोपचार न करता जवळच्या महापालिका दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी फुलांच्या कुंड्या, फ्रिज ट्रे, कूलर, टायर, ड्रम आणि उघड्या भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून किमान एक दिवस ‘ड्राय डे’ पाळून पाण्याची भांडी रिकामी व स्वच्छ करावीत, असे महापालिकेने आवाहन केले आहे.