ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक

Share

पुणे- विषारी गावठी दारू प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावण्यात आली आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात २६ मे रोजी विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गावठी दारूमध्ये नशा वाढवण्यासाठी व कमी खर्चात निर्मिती करण्यासाठी घातक मिथेनॉल रसायनाचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह एरवी १० हून अधिक आरोपींवर कठोर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा आणि कर्तव्यातील हलगर्जीपणा दाखवल्याने पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.