ब्रेकिंग न्यूज

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू 

Share

अमरावती – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरिन रुग्णालय) नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे साडेतीन वाजता वेंटिलेटरमधील स्फोटामुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत धुरात गुदमरल्यामुळे ३ नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६ बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार,आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अतिदक्षता विभागात असलेल्या व्हेंटिलेटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन भीषण स्फोट झाला आणि त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. क्षणार्धात संपूर्ण वार्डात धुराचे लोट आणि आगीचे तांडव निर्माण झाले.

या अतिदक्षता विभागात तब्बल ३९ नवजात बालकांना उपचारासाठी दाखल केले होते. यापैकी एका कक्षात आग लागली. या कक्षात एकूण १२ बालके होती. धुराचे लोट पसरताच ऑन-ड्यूटी असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत धावपळ सुरू केली. या कक्षातील बालकांना जीवाची पर्वा न करता वेगाने बाहेर काढले. अनेक बालकांचे प्राण वाचवण्यात यश आले असले, तरी ३ निष्पाप बालकांचा या आगीत दुर्दैवी अंत झाला.

अवघ्या वर्षभरापूर्वी हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.