ब्रेकिंग न्यूज

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Share

पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला, शुक्रवारी अभाविप आणि एनएसयूआय च्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्याच्या सीओईपी (COEP) टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेल परिसरात तुफान राडा झाला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ५० ते ६० काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनएसयुआयचे कार्यकर्ते हॉस्टेलमध्ये घुसले आणि त्यांनी विद्यार्थिनींवर आगामी कार्यक्रमासाठी नाव नोंदवण्यासाठी जबरदस्ती केली असा आरोप अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला तर कार्यक्रमाला आणि स्कॉलरशिपच्या मुद्यांवर पाठिंबा दर्शवणाऱ्या दोन विद्यार्थिनींना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हॉस्टेलमध्ये डांबून ठेवून धमकवले असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या तणावामुळे कॉलेज परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार घटनास्थळी दाखल झाले. वडेट्टीवार वसतिगृहामध्ये पोहोचले असताना तिथे प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी गृहमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “अनाथ मुलींना वसतिगृहात कोंडून मारहाण करणे, धमकावणे आणि त्यांच्यावर खोटे व्हिडिओ बनवण्यासाठी दबाव आणणे हा अत्यंत नीच प्रकार असून ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची हुकूमशाही विचारसरणी आहे” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मुलींना डांबणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई झाली नाही, तर उद्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते तीव्र धरणे आंदोलन करतील आणि याची सर्व जबाबदारी पुणे पोलिसांची असेल, असा इशारा त्यांनी दिला.