ब्रेकिंग न्यूज

‘आय फोन’ने घेतला एकाच कुटुंबातील तिघांचा जीव, थरारक घटनेने संभाजीनगर हादरले

Share

छत्रपती संभाजीनगर – आयफोनचा हप्ता भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आईवडील आणि मुलाचा दरीमध्ये पडून मृत्यू झाला. ही घटना तिसगाव परिसरातील टेकडीवर शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरून गेले आहे.

कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९ वर्षे ) मुरलीधर दामोधर चांदगुडे (वय ४८ वर्षे ) संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२ वर्षे )अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणालने काही दिवसांपूर्वी आयफोन खरेदी केला होता. त्याचा हप्ता भरण्यासाठी वडिलांकडे पैसे मागत होता. त्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

गुरुवारी सकाळी याच कारणावरून वाद झाल्यानंतर कुणाल घरातून निघून गेला आणि वाळुंज एमआयडीसीच्या हद्दीतील खवड्या डोंगराच्या धोकादायक कड्यावर आत्महत्येच्या विचाराने जाऊन उभा राहिला. तिथून त्याने हप्ता भरा नाहीतर कड्यावरून उडी मारून आत्महत्या करतो अशी धमकी दिली.

माहिती मिळताच आई-वडील, स्थानिक नागरिक, एमआयडीसी वाळूज पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाला खाली उतरवण्यासाठी तब्बल तीन तास विनवणी आणि मनधरणी सुरू होती. दरम्यान तुला नवीन आयफोन १५ घेऊन देतो. असेही वडिलांनी सांगितले. पण कुणाल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दुपारी १ ववाजण्याच्या सुमारास वडील त्यांच्याजवळ गेले आणि त्याच्या हाताला धरून मागे खेचण्याचा प्रयत्न केला. पण कुणाल याने हाताला झटका दिला. निसरड्या कड्यावरून वडिलांचाही तोल गेला आणि ते कुणालसह शेकडो फूट खोल दरीत कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर पती आणि पोटचा गोळा दरीत कोसळताना पाहून आई संगीता यांना तीव्र धक्का बसला आणि त्यांनीही त्याच क्षणी दरीत उडी घेतली. ही संपूर्ण घटना प्रत्यक्षदर्शीच्या मोबाईलमध्ये चित्रित झाली. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.