पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा
‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षकाने बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप पत्नीने फिर्यादीमध्ये केला आहे.
धनाजी रंगराव टोणे आणि अनसूया रंगराव टोणे (रा. पी. एस. व्हिला, शेवाळेवाडी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. टोणे हे मांजरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर धनाजी टोणे सुट्टीवर गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी टोणे आणि फिर्यादी महिलेचा विवाह १९ मे २०१९ रोजी झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांनी टोणे याने पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ‘तू नोकरी कर, कमव’ असे म्हणत शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२०२० मध्ये पत्नी गर्भवती असतानाही तिला दर तीन-चार दिवसांनी मारहाण केली जात होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धनाजी टोणे यांनी पत्नी आणि मुलीच्या अंगावर उकळते दूध फेकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप महिलेने केला आहे. मे २०२५ मध्ये बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर गर्भात मुलगी असल्याचे समजले. त्यानंतर टोणे आणि त्यांच्या आईने गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. गर्भपात न केल्यास दोन्ही मुलींना घेऊन माहेरी जाण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांजरी पोलिस करीत आहेत.
