पुणे- आम्हाला मारहाण करून जेलमध्ये गेलेल्यांच्या स्टेटस व्हॉटसअॅपला का ठेवतोस या कारणावरून दोघा अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या युवकाच्या डोक्यात हातोडीने वार करुन त्याचा निर्घृण खून केला. कोथरुड येथील एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात मंगळवारी रात्री ही घटना घडली.
नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरुड) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एआरएआय टेकडीवरील जंगलात एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती या ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यात डोक्यात मारहाण झाल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी मृताची माहिती सर्वत्र दिल्यानंतर तो नील विजय नाईक याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.
नील नाईक व आरोपी हे अल्पवयीन असून एकाच वस्तीत राहतात. आरोपी व त्यांच्याविरोधातील मुलांमध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. ती मुले सध्या कारागृहात आहेत. नील नाईक याची त्या मुलांबरोबर ओळख असल्यामुळे त्याने त्यांचे व्हॉटसअॅपला स्टेटस ठेवले होते. तेव्हा आरोपी मुलांनी नील नाईक याला विचारले की आपण एकाच वस्तीत राहतो, असे असताना तू आम्हाला मारहाण करुन जेलमध्ये गेलेल्यांचे स्टेटस का ठेवतो. यावरुन त्यांच्यात मंगळवारी वाद झाला.
त्यानंतर त्यांच्यात समेट होऊन ते फिरायला गेले. रात्री दोघे जण नील नाईक याला घेऊन एआरएआय येथील टेकडीवरील जंगलात आले. तेथे त्यांनी हातोडीने त्याच्या डोक्यात वार करुन त्याचा खून केला. कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करीत आहेत.
