ब्रेकिंग न्यूज

लावणीच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉर सर्टिफिकेट आवश्यक, अश्लीलता असल्यास होणार कारवाई

Share

मुंबई- ग्रामीण भागातील लोकांपासून शहरी प्रक्षकांपर्यंत सर्वांना लावणीचे ठसकेबाज नृत्य पाहायला आवडते. अलीकडच्या काळात लावणीच्या कर्यक्रमामधून अश्लीलतेचे प्रदर्शन होत असल्याचे दिसून येते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. लावणीचा कार्यक्रम सादर करण्यापूर्वी राज्याच्या सेन्सॉरचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे तक्रार केली होती. महाराष्ट्रातील लावणी, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील डी जे लावणी तसेच आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि तक्रारींमुळे लावणीच्या कार्याक्रमासाठी राज्याच्या सेन्सॉरचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पारंपरिक लावणीचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंचावरील अश्लील हावभावांवर नियंत्रण आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी लावणी, तमाशा, लोकनाट्य किंवा कोणताही लोकसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी त्याची संहिता (Script), निवेदन आणि सादरीकरणाचा सारांश रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे सादर करावा लागेल. मंडळाकडून कार्यक्रमात कोणतीही अश्लीलता नसल्याची खात्री पटल्यानंतरच हे प्रमाणपत्र दिले जाईल. त्याशिवाय कार्यक्रमाला परवानगी मिळणार नाही. लावणीच्या कार्यक्रमांमध्ये पाश्चिमात्य किंवा डीजे (DJ) संगीताचा वापर न करता, केवळ ढोलकी, हलगी, तुणतुणे यांसारख्या पारंपरिक वाद्यांचाच वापर करणे बंधनकारक आहे.

स्थानिक पोलीस ठाण्यांना कोणत्याही सार्वजनिक लावणी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्यापूर्वी आयोजकांकडे रंगभूमी मंडळाचे प्रमाणपत्र आहे की नाही, याची कडक पडताळणी करावी लागेल. जर कोणत्याही कार्यक्रमात प्रमाणित केलेल्या संहितेव्यतिरिक्त अश्लील किंवा आक्षेपार्ह भाग आढळल्यास, संबंधित आयोजक आणि कलाकारांवर पोलिसांमार्फत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

या संदर्भात राज्याच्या रंगभूमी प्रयोग परिरक्षण मंडळाचे सचिव सं. पु. खामकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि सर्व जिल्हा पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे.