पिंपरी- पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने पछाडलेल्या पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि पत्नीच्या हत्येनंतर पतीनेही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
प्रियांका मारुती इगवे असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून महादेव मारुती इगवे असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, महादेव इगवे यांना त्यांच्या पत्नीचे निलेश दिलीप कांबळे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून पती-पत्नीमध्ये वाद होते.
प्रियांका यांचा खून केल्यानंतर महादेव यांनीही त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महादेव इगवे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील पिसेगावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते कुरुळी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
