ब्रेकिंग न्यूज

फरासखाना पोलीस ठाण्याच्या जागेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा विस्तार होणार, पुणे पोलिसांची तत्त्वतः मान्यता 

Share

पुणे – पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारीकरणासाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिराशेजारी असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा मंदिराच्या विस्तारिकरणासाठी हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्त्वतः ‘ना हरकत’ दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पाठवला आहे.

बुधवार पेठेतील महापालिकेच्या सिटी सर्व्हे क्रमांक १११२ आणि १११३ मधील ७५९.२० चौरस मीटर जागा आधी पोलीस विभागाच्या नावावर केली जाईल. त्याठिकाणी विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यासह पोलिसांसाठी नवीन अत्याधुनिक संकुल उभारल्यानंतरच  हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली जाणार असे प्रस्तावात नमूद केले आहे.

तसेच नवीन पोलीस संकुल उभारणीचा खर्च दगडूशेठ ट्रस्ट किंवा गृह विभागाने करावा. सध्याच्या सरकारी जागेची जी किंमत असेल, ती ट्रस्टला सरकारला अदा करावी लागेल. नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत सध्याच्या इमारतीतूनच पोलीस कामकाज सुरळीत सुरू राहील, या अटींवर जागा दिली जाणार आहे.

हिंदू महासभेच्या आनंद दवे यांचा आक्षेप 

दरम्यान, हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी शनिवारवाडा, सारसबाग किंवा शाळेचे मैदान या ठिकाणी पर्यायी जागा देण्याची मागणी दवे यांनी केली आहे. कारण भाविकांची वाढती गर्दी पाहता पोलीस ठाण्याची जागा देखील भविष्यात अपुरी पडू शकते असे त्यांचे मत आहे.