महापालिकेच्या मुख्यालयात झळकणार दिवंगत अजितदादा, लक्ष्मणभाऊ व अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे
पिंपरी- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, माजी आमदार दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तैलचित्रे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात लावण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारामुळे हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून त्यांच्या मंजुरीनंतर ही तैलचित्रे महापालिकेच्या मुख्यालयात व सभागृहात झळकणार आहेत.
यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार थेट पद्धतीने काम देण्यास मान्यता घेण्यात येणार आहे.मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात ही तैलचित्रे लावण्यात येणार आहेत.
यापूर्वी महापालिका सभेने अजितदादा पवार व लक्ष्मणभाऊ जगताप यांची तैलचित्रे लावण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर महापौरांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिन्ही तैलचित्रे बसविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.
चित्रकार सुनील शेगावकर यांच्याकडून ही तैलचित्रे तयार करण्यात येणार आहेत. अजितदादा पवार व लक्ष्मणभाऊ जगताप यांची प्रत्येकी ८ बाय ५ फूट, तर अहिल्यादेवी होळकर यांचे ६ फूट ६ इंच बाय ४ फूट आकाराचे तैलचित्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक खर्च महापालिकेच्या अंदाजपत्रकातील विशेष योजनेतून करण्यात येणार आहे.
गुरुवारी होणाऱ्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तैलचित्रे लावण्याच्या कामाला गती येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
