ब्रेकिंग न्यूज

भयानक ! नामांकित ब्रँड्सच्या दुधाच्या बनावट पिशव्या छापून त्यातून भेसळयुक्त दूध विक्री

Share

मुंबई – अमुल आणि गोकुळ सारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट दूध पिशव्या तयार करून त्यातून भेसळयुक्त दूध विकणाऱ्या एक रॅकेट मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले आहे. वसई येथून मुख्य आरोपीसह ४ जणांना अटक केली आहे. 

रामूलू गुरुवर्य बोडुपल्ली (वय ६५), लिंगय्या भिक्षमय्या गंटा (वय ४५), सैदूलू याद्या जंगीली (वय ३३), याद्या चंद्रय्या बतुला (वय ४६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट १२ च्या पथकाला नामांकित ब्रॅण्ड्सच्या दुधाच्या बनावट पिशव्या छापणाऱ्या टोळीची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मुंबईतील दहिसर आणि पालघरमधील वसई पूर्व परिसरात छापे टाकले.

हे भामटे मूळ ब्रँडेड दुधाच्या पिशव्या कापून त्यातील काही दूध काढून घ्यायचे आणि त्यात अस्वच्छ पाणी मिसळायचे. त्यानंतर वसईत छापलेल्या बनावट पिशव्यांमध्ये हे भेसळयुक्त दूध भरून ते पुन्हा सील करून बाजारात विकायचे.

या कारवाईत पोलिसांनी १३,००० बनावट रिकाम्या पिशव्या, ४७० लिटर भेसळयुक्त दूध आणि पिशव्या छापण्याची १० लाखांची यंत्रसामग्री जप्त केली आहे. २०२१ पासून गोरखधंदा सुरु असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये दरमहा सुमारे ३०,००० याप्रमाणे आतापर्यंत १८ लाख बनावट पिशव्यांचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत होते.